सोलापूर -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक, पोलीस, इतर विभागांचे कर्मचारी यांना वारंवार हात धुता यावेत यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये "हॅन्ड वॉश स्टेशन" सुरू केले आहेत, याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने आपले हात नकळत तोंड, नाक व डोळे या अवयवांना लागून होत आहे. एखाद्या धातूच्या किंवा वस्तूंच्या पृष्ठभागावर कोरोना चे विषाणू असतील आणि त्यास आपल्या हातांचा स्पर्श झाला तर विषाणूची लागण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपले दोन्ही हात वारंवार साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन सांगोले नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने यांनी पाणीपुरवठा विभागाकडील टाकाऊ लोखंडी पाईप, उपलब्ध जुन्या टाक्या आदींचा वापर करून हे "हँडवॉश स्टेशन" 3 दिवसात तयार करून गर्दीच्या ठिकाणी बसविले. या "हॅन्ड वॉश स्टेशन" ला रस्त्यांवरील दुभाजकांवर जाणीवपूर्वक बसविण्यात आले आहे जेणेकरून हात धुवून झाल्या नंतर खाली पडणारे पाणी वाया न जाता दुभाजकांवरील झाडांना दिले जाईल.
सांगोलकरांच आरोग्य उत्तम राहावे या हेतूने पाणीपुरवठा विभागाकडील टाकाऊ लोखंडी पाईप, उपलब्ध टाक्यांचा कार्यक्षम वापर करून बनवलेले हे "हॅन्ड वॉश" स्टेशन्स कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी विशेषतः बंदोबस्तासाठीचे पोलीस, नगरपालिका कर्मचारी व अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर आलेले नागरिक यांच्यासाठी निश्चिपणे उपयोगी ठरतील. नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये सुद्धा वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवावेत आणि विनाकारण घराबाहेर न पडता प्रशाशनास सहकार्य करावे.असे अहवान मुख्याधिकाऱ्यानी केले आहे.