सोलापूर - सांगोला नगरपरिषदेने सुरू केलेल्या "ऑक्सिजन स्क्रिनिंग" उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण "ऑक्सिमीटर" या उपकरणाच्या साहाय्याने मोजून पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
शहरास कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक महत्वाचा भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेने सुरू केलेल्या "ऑक्सिजन स्क्रिनिंग" उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण "ऑक्सिमीटर" या उपकरणाच्या साहाय्याने मोजून पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
कोरोना विषाणू चा शहरात शिरकाव होऊ नये याकरिता सांगोला नगरपरिषदेने माघील अडीच महिन्यात शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम अतिशय कार्यक्षम पध्दतीने राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदने शहरातील जवळपास ७ हजार ५०० कुटुंबे व ३८ हजार नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण "ऑक्सिमीटर" या उपकरणाच्या साहाय्याने मोजले.
पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण मानवी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. हे उपकरण हाताच्या बोटांना लावले जाते व त्यावर येणाऱ्या रिडींग वरून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चटकन लक्षात येते. सामान्यपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५% ते ९८% इतके असते. जर हे प्रमाण ८५% पेक्षा खाली खाली उतरत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते. अनेक कोरोना बाधित रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचे लक्षणे आढळून हेत नाहीत. परंतु, त्याच वेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी कमी होत जाते. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर रुग्णास कळते व रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते.
नेमकी हीच बाब ओळखून सांगोला नगरपरिषदेने ही "ऑक्सिजन स्क्रिनिंग" ची मोहीम हाती घेतली होती.
या ऑक्सिजन स्क्रिनिंग मोहिमेत प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे १० पथकं तयार केले होते. सदर पथकामध्ये श्री.शरद चव्हााण, विनोद लिंगे,खंडु कोरे, संतोष जांगळे,अनिकेत चंदनशिवे,सागर खुळपे,सुरज चांदणे,आनंद हुलजंतीकर,सुरज सागर या कर्मचा-यांची नियुक्ती केली होती. सदर पथकामार्फत शहरात घरोघरी फिरून शहरातील जवळपास ३८ हजार नागरिकांची ऑक्सिजन स्क्रिनिंगची तपासणी पूर्ण केली आहे. यामध्ये तपासणी पूर्वी प्रत्येक नागरिकांच्या हातांना सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करून त्यानंतर "पल्स ऑक्सिमीटर" उपकरनाने ही तपासणी केली गेली. ज्या नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, अशा नागरिकांची ग्रामीरुग्णालयात तपासणी केली जाते.
थर्मल स्क्रिनिंग,ऑक्सिजन स्क्रिनिंग या दोन्ही तपासणी मोहीमा नगरपरिषदेने अतिशय व्यापक स्वरूपात हाती घेतल्या होत्या. या संपूर्ण स्क्रिनिंग दरम्यान संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. नागरिकांनी यापुढेही अश्याच प्रकारे नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
शहरातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही "ऑक्सिजन स्क्रीनिंग" मोहीम पूर्ण करण्यात आली असून नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी घरी आल्यानंतर त्यावेळी घरी नसलेले काहीजण यातून सुटले असल्यास त्यांनी नगरपरिषदेशी संपर्क करावा, त्यांची देखील तात्काळ तपासणी केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा राणिताई माने यांनी दिली.