सोलापूर Sambhavah Foundation Diwali:दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधामध्ये साजरा झाले. यंदा निर्बंधमुक्त असल्यानं मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे होत आहेत. सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी झाली. तर समाजातील वंचित महिलांना आणि गरजू मुला-मुलींना दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी संभव फाउंडेशन तर्फे अनोखा उपक्रम राबवला आहे.
वारांगनासोबत यंदाची दिवाळी : संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीची (Diwali 2023) धामधूम पाहायला मिळत आहे. तर सोलापुरात भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला समाजात उपेक्षित असणाऱ्या वारांगनासोबत यंदाची दिवाळी साजरी करून, संभव फाउंडेशनने अनोखी भाऊबीज साजरी केली. त्यांनी दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अंधाऱ्या आयुष्यात संभव फाउंडेशनने 'एक दिवा वारांगनाच्या दारात' लावून लख्ख प्रकाश देण्याचा प्रयत्न केला.
वारांगनाच्या दारात दिवाळीचा दिवा: मान्यवरांच्या उपस्थितीत वारांगनाच्या दारात दिवा लावून उपस्थित महिलांना दिवाळीचा फराळ, साडी, मिठाई भेट देण्यात आली. यावेळी महिलांनी भुईचक्कर, झाड, फुलबाजा, फटाके उडवत आंनदाने दिवाळी साजरी केली. यंदाच्या वर्षी एड्स या विषयावर जनजागृतीचे पोस्टर प्रदर्शन करून सामाजिक संदेश देण्यात आला.
वारांगनासोबत दिवाळी साजरी करून आदर्श: समाजात वारांगना महिलांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. सामाजिक संदेश देण्यासाठी वारांगनांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, आकाश बनसोडे, चेतन लिगाडे, गणेश पवार, पवन व्हनकवडे, तुषार आवताडे, अनिकेत गायकवाड, प्रेरणा बनसोडे, अमोल रामनवरे, विशाल घंटे, सुकन्या रामनवरे, गजल शेख, आतिश सोनवणे, शैलेश आवळे, रवी सोनकांबळे, महेश शिवशरण, संतोष माने आदींची उपस्थिती होती.