सोलापूर- जुळे सोलापुरातील चाणक्य नगरात रस्त्याच्या मागणीसाठी चक्क यमराज अवतरले आहेत. संभाजी ब्रिगेडने हे अनोखे आंदोलन केले.
रस्त्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन जुळे सोलापुरातील चाणक्य नगर येथील अत्यंत खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे अनेक नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी यमराजाच्या रूपात आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापूर भागाचा विस्तार झपाट्याने होत असताना नागरी लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हद्दवाढ होऊन 17 वर्षांचा काळ लोटला, तरी नागरिकांना रस्त्याची आणि ड्रेनेज लाईनची सुविधा अद्याप मिळाली नाही.
हेही वाचा - जानेवारीत 'उजनी'तून शेतीसाठी सुटणार पाण्याचे आवर्तन
या भागाकडे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आजवरचा विकास खुंटला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य नाही झाल्यास महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला आहे.
पाच दिवसाआड पाणी तेही अवेळी सोडले जाते. त्यातच ड्रेनेजचे काम अर्धवट असल्याने ड्रेनेज लाईनची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे कच्चे रस्ते खूपच खराब झाले आहेत. अंतर्गत रस्त्यात खूप खड्डे पडल्याने जेष्ठ नागरिकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागते. काही विद्यार्थी व महिला या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा - 'युजीसी'च्या परिपत्रकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केराची टोपली
यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, उपाध्यक्ष श्रीमंत पात्रे, सचिव गोविंद चव्हाण, नितीन होनमाने, गणेश गरगडे, सचिन शिरसागर, नवनाथ देडे, चेतन चौधरी, कपिल आलाट यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.