सोलापूर- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत (पीएमईजीपी) रुपाली बोराडे या तरुणीचे कर्ज प्रकरण रखडल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ऑक्टोबर) दिवसभर सोलापुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मुख्य बँक अधिकारी उकरंडे यांच्यासोबत बैठक घेऊन कर्ज का मंजूर करत नाही, असा जाब विचारत असताना इतर कार्यकर्त्यांनी बँक व्यवस्थपकाच्या अंगावर शाई फेकून निषेध केला. यावेळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
रुपाली बोराडे या उच्चशिक्षित तरुणीने सात महिन्यांपूर्वी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत पशुखाद्य निर्मिती प्रकल्पासाठी लागणाऱ्या कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. हे अर्ज ऑनलाइनरित्या मंजूर होऊन करकंब (ता. पंढरपूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेकडे ऑनलाइनरित्या मंजुरीसाठी गेले होते. पण, करकंब येथील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी रुपाली बोराडे या तरुणीला स्थावर तारण मागून वेगवेगळ्या कागदोपात्रांची मागणी केली होती. गेल्या सात महिन्यापासून रुपाली बोराडे बँकेच्या हेलपाटे मारत होत्या. शेवटी रुपाली यांचे बंधू यांनी 6 ऑक्टोबर रोजी कंरकंब येथील स्टेट बँकेसमोर एक दिवसाचे उपोषण देखील केले होते.
संभाजी ब्रिगेडच्या शाम कदम यांनी याची दखल घेत कार्यकर्त्यांसोबत करकंब येथील बँक अधिकाऱ्यांच्या मुजोर व मनमानी कारभाराविरोधात रुपाली बोराडे व त्याच्या परिवारासह बाळीवेस येथील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवारी दुपारपासून धरणे आंदोलनास सुरुवात केली. त्यासोबत सकल मराठा समाजाचे माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, राजन जाधव यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाची ठिणगी वणवा बनू नये म्हणून ताबडतोब जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोनदर आपल्या पोलीस फौजफाट्यासह दाखल होऊन आंदोलन शमविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण, आंदोलनकर्त्यांनी काहीही न ऐकता मराठा समाजातील युवकांना व तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणून हे तरुण तरुणी उद्योजक होण्याच्या तयारीत असताना बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे देखील स्वप्न अपूर्ण राहत आहेत, जोपर्यंत पीएमईजीपीचे कर्ज प्रकरण मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.