सोलापूर - सोलापूरचे स्वादिष्ट जिन्नस, करू राज्यभरात फेमस..! असे म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगोल्यातील छोटे व्यावसायिक विलास व्हनमाने यांच्या हॉटेल विलासमध्ये भजी, शेव चिवड्याचा आस्वाद घेतला. तुमच्या मेहनतीला आणि दर्जेदार उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी माझी असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सांगलीचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरकडे जात असताना सांगोलो येथे शेवचिवड्याचा आस्वाद घेतला.
माढा लोकसभेच्या निवडणूक प्रचारावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मागच्या महिन्यात सांगोल्यात प्रचारसभा व गाव भेटीचा धडाका लावला होता. त्यादरम्यान त्यांना कोणी सांगितले, इथे स्वादिष्ट शेव चिवडा मिळतो. मात्र, निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत देशमुख यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मात्र आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सांगलीचे पालकमंत्री या नात्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सकाळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी आले होते.