सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत हे शनिवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र राज्याच्या महाभारतामधील शकुनी मामा म्हणजे शरद पवार, असे खोत यांनी टीकास्त्र सोडले. शरद पवारांनी महाराष्ट्र राज्यात सोंग घेत, भाजप शिवसेनेचे सरकार घालवलेले होते असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. शरद पवारांनी गुगली टाकली असे म्हटले होते. त्या गुगलीवर सदाभाऊ खोत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अपघातात मृत्यू झालेले मृतात्मे हे देवेंद्रवासी होतात. शरद पवारांच्या या वक्तव्याला रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले आहे.महाराष्ट्र राज्यात औरंगजेब असताना त्याच्या घोड्यांना, सैन्याला पाणी पीत असताना पाण्यात संताजी धनाजी दिसत होते. तसे शरद पवारांना समृद्धी महामार्गावर अपघात झाला की, मृतात्म्यात देवेंद्र फडणवीस दिसायला लागले आहेत. ही पवारांच्या राजकीय जीवनातील मोठी शोकांतिका आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पवारांच्या गुगलीवर सदाभाऊ खोत :सोलापुरात शनिवारी रात्री कासेगाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या गुगलीवर देखील उत्तर दिले आहे. शरद पवारांनी गुगली टाकली होती, असे वक्तव्य केले होते. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो, असेही शरद पवार म्हटले होते. मुळात शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष होते ते बेकायदेशीर होते. त्यांना क्रिकेटबद्दल काहीही महिती नसताना ते क्रिकेटचे अध्यक्ष कसे झाले? तसेच महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष देखील होते. त्यांना कुस्तीमधील कोणता पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कुठे कुस्त्या गाजवल्या आहेत? त्या माझ्या काही ऐकण्यात आल्या नाहीत. पण जिथे पैसा असतो तिथे पवार घराणे असते, असे टीकास्त्र सदाभाऊ खोत पवार घराण्यावर सोडले.