सोलापूरSachin Chaudhary suicide : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास होटगी पुलावर घडली. हा विद्यार्थी अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. सचिन श्रीमंत चौधरी (वय 23 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट : सचिन श्रीमंत चौधरी हा मुळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवाशी आहे. तो अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या : सचिन चौधरी सोलापुरातील कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज या खाजगी वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. त्यानं आत्महत्या केल्याचं समजताच त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सचिन चौधरी हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती हे संभाजीनगर येथे शेतकरी आहेत. सचिन हा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होता. बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर सचिनच्या कुटुंबीयांनी लाखो रुपयांची फी भरून त्याला सोलापूरच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं. सचिन कुटुंबातील पहिला डॉक्टर होणार होता. सचिननं पहिल्या वर्षीही चांगले गुण मिळवले होते. तो वर्गात सगळ्यांशी चांगलं राहत होता. वसतिगृहात राहूनही सचिनचा स्वभाव चांगलाच होता. रविवारी सकाळी तो वसतिगृहातून मित्राची दुचाकी घेऊन गेला होता. शहराजवळील होटगी गावाजवळ आल्यावर त्यानं धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
सचिनच्या मित्रांना धक्का : अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सचिन चौधरीनं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समजताच त्याच्या मित्रांना धक्का बसला. वळसंग पोलिसांनी पंचनामा करून सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामुळं वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी यांनाही माहिती देण्यात आली असून ते संभाजीनगरहून सोलापूरला रवाना झाले आहेत.
हेही वाचा -
- प्रेयसीसोबत झालं भांडण; मुंबई पोलीस कॉन्स्टेबलने संपवलं जीवन
- युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या; ठाण्यातून आरोपी पतीला अटक
- व्हॉट्सअपवरून झाला वाद; तरुणाने केली आत्महत्या