सोलापूर -सोमवारी पंढरपूर नगरपालिकेची विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. मात्र, या सभेत नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. नगरसेवकांना विश्वासात न घेता कामकाज केला जात असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी केल्यामुळे सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वांचे राजीनामे घेऊन नगरपरिषदेवर प्रशासक नेमून टाका, अशी मागणी देखील सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दगडू धोत्रे यांनी केली आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे वातावरण गंभीर बनले आहे. असे असताना राजकारण देखील टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेतील दोन्ही राजकीय गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीही सोडत नसल्याचे कोरोना महामारीच्या काळात देखील दिसत आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या विशेष सभेत सत्ताधारी नगरसेवकांचा गोंधळ.... हेही वाचा...शिवराज्याभिषेक दिन सोहळा यंदा मावळ्यांनी घरातूनच साजरा करावा - छत्रपती संभाजीराजे
पंढरपूरमधील ६५ एकर जागेत कोविड रुग्णालय उभे करण्यासाठी, प्रस्तावावर मंजुरी घेण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली होती. नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. मात्र, या सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनासह आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर सडेतोड टीका केली. तसेच सर्वांची राजीनामे घेऊन प्रशासक नेमण्याची केली. सत्ताधारी पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दगडू धोत्रे यांनी भर सभागृहात ही मागणी केल्याने पंढरपूर नगरपरिषदेचा हा कारभार नव्याने समोर आला आहे.
गदारोळात कोविड रूग्णालयाचा प्रस्ताव मंजूर ;
सोमवारी सकाळी या विशेष बैठकीला सुरवात झाली. बैठकीच्या सुरवातीलाच विरोधकांनी आक्रमक होणे अपेक्षित होते. मात्र, त्याउलट सत्ताधारी नगरसेवकच विरोधक म्हणून मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंढरपूरचे दोन माजी नगराध्यक्ष आणि जेष्ठ नगरसेवक दगडू धोत्रे, तसेच वामन बंदपट्टे यांनी प्रशासनाबरोबरच सत्ताधारी नगरसेवकांच्या एकतर्फी कारभारवर तोफ डागली.
जागतिक महामारीच्या काळात विरोधकांनाही सोबत घेवून लढा देणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी असूनही आम्हालाच विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप दगडू धोत्रे यांनी केला. फक्त दोन-तीन नगरसेवक म्हणजे पंढरपूर नव्हे, असा टोलाही त्यांनी सत्ताधारी आघाडीच्या प्रमुखांना लगावला. 'आम्ही गोर गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. मी दलित असल्याने मला यांची दु:ख जवळून माहिती आहेत. बंगल्यात राहणाऱ्या लोकांना हे समजणार नाही. या काळात तुम्ही सत्ताधारी नगरसेवकांना विश्वासात घेत नाही, मग विरोधकांचे काय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येकाला शहराची काळजी आहे. त्यामुळे शहराबद्दलचा निर्णय घेताना विश्वासात घेणे गरजेचे आहे. असा जेष्ठत्वाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. कोविड रुग्णालय उभारणीसाठी बैठक घेतली जात असेल, तर त्याची संपूर्ण माहिती सभागृहाला देण्याची मागणी त्यांनी केली. धोत्रेंनी आपल्या शैलीत पक्षनेते संग्राम अभ्यंकर यांना कोविड रुग्णालय कोण आणि कसे उभारणार आहे, याची विचारणा केली. याच गोंधळात पंढरपूरातील 65 एकरात कोविड रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.