माढा (सोलापूर)- तालुक्यातील केवड गावात पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरांनी तब्बल 7 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. उन्हाळ्यामुळे उकडत असल्याने कुटुंबातील व्यक्ती घरावर झोपायला गेल्यानंतर चोरांनी डाव साधला आहे. चोरीची ही घटना शुक्रवारी रात्री मनोहर सुभाष पाडोळे यांच्या घरी घडली. यामध्ये त्यांच्या माळवदावर झोपायला आलेल्या मित्रांचे पैसे आणि दागिने चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी मनोहर सुभाष पाडोळे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात माढा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या चोरीची अधिक माहिती अशी की, मनोहर पाडोळे हे पुण्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन असल्याने पाडोळे हे मुळ गाव असलेल्या केवड मध्ये आले होते. शुक्रवारी मित्रा समवेत जेवण करुन ते गावातील घरी झोपण्यासाठी गेले होते.
पाडोळे आणि मित्रांचे दागिने-
उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरामध्ये गरम होत असल्याने पाडोळे यांच्या घरी संतोष सावंत, विजय घुले, अमोल धर्मे हे मित्र झोपण्यासाठी आले होते. घराच्या स्लॅबवर झोपण्यास जाण्या अगोदर पाडोळे यांनी गळ्यातील सोन्याची चैन, ब्रासलेट, सोन्याची ५ अंगठ्या तसेच संतोष सावंत यांनी सोन्याची चैन, ४ अंगठी व रोख १ लाख रक्कम असा दोघांचा मुद्देमाल रुमालात बांधुन पाडोळे यांनी घरातील कपाटाच्या लाॅकर मध्ये ठेवले आणि लाॅकरची चावी तिथेच ठेवुन घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपण्यास गेले होते.