सोलापूर -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर राज्यात सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याला जोडणारे अनेक रस्ते प्रशासनाने बंद केले. मात्र, करमाळा तालुक्यात चक्क रस्ताच खोदून ठेवल्याने उपचाराअभावी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा कोंढार चिंचोली (ता. करमाळा) येथील जुना रेल्वेपूल ज्याला सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजले जाते, तो चक्क जेसीबीच्या साहाय्याने उकरून टाकण्यात आला. यामुळेच वेळेत उपचार न मिळाल्याने कोंढार चिंचोली येथील शिवाजी सोपान डफळे (७०) यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.
धक्कादायक ! कोरोनोचा असाही बळी.. जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी जिल्हाबंदीसाठी किंवा गावबंदीसाठी रस्ते खोदून ठेवल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातच सोलापूर जिल्ह्यात एका रुग्णाचा जिल्हाबंदीमुळे उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हेही वाचा...लॉक डाऊनचा असाही इफेक्ट! तळीरामांनी दारूसाठी चक्क दारूची दुकाने फोडली
करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथील शिवाजी डफळे यांना गुरुवारी दुपारी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी भिगवण येथे न्यायचे होते. परंतु जिल्हाबंदी असल्याने आणि जिल्ह्याच्या सीमेवर डिकसळ येथील पुलाच्या अलिकडे रस्ता खोदल्याने त्यांना भिगवण येथे नेता आले नाही. अखेर उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाचा असाही एक बळी गेल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. डफळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.