सोलापूर-राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झालते, दरम्यान आता तिसऱ्या लाटेची देखील शक्यत वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी युद्धपातळीवर कोविड रुग्णालये कसे उभारता येतील, याचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी घेतला आहे.
सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या चौधरी बाल रुग्णालयात सध्या सर्वसाधारण कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या बाल रुग्णालयात बालकांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 50 पेक्षा अधिक बालकांवर एकाच वेळी उपचार करण्याची क्षमता या रुग्णालयात असून, सुरुवातीला या रुग्णालयात बालकांसाठी 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, डॉ. रोहन वायचळ, डॉ. सचिन पवार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील चौधरी बाल रुग्णालयाची पाहणी केली.