पंढरपूर -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल व मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निकालाची उत्सूकता शिगेला पोहोचले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार की, भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देऊन कमळाचा मार्ग सुखकर करणार याबाबतीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे, भाजपचे समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या मत विभागणीचा फटका कोणत्या प्रस्थापित उमेदवारांना बसणार आहे. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मतदारसंघाच्या निकालातून मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या विश्वासाची कसोटी -
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर 17 मार्च रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणुकीमध्ये भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. तर भारतीय जनता पार्टीकडून आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने उद्योगपती समाधान आवताडे यांना रिंगणात उतरविण्यात आले. मात्र, या पोटनिवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कामगिरीवर भविष्य ठरणारी आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन राज्यातील करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रस्थापित पक्षांकडून पोटनिवडणूक हायप्रोफाईल करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीतील विजयानुसार राज्यातील राजकीय गणित मांडली जाणार आहे.