बार्शी - रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि वाढती मागणी याचा गैरफायदा काहीजण घेत आहेत. असाच प्रकार बार्शीत उघडकीस आला आहे. वाजवीपेक्षा अधिकच्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चौघांवर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी रेमडीसीवर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणी आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. विनापरवानाविना दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री 50 हजार रुपयांना विक्री केल्यावरून बार्शी शहर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सुभाष वायचळ (रा. जावळी प्लॉट), निखिल राजकुमार सगरे (रा. बळेवाडी, ता. बार्शी), विकास काशीनाथ जाधवर (रा. जावळी प्लॉट, बार्शी), भैय्या इंगळे (रा. येडशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा -अंबरनाथमध्ये 'सैराट'; प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची हत्या
यासंबंधी औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी फिर्याद दाखल केली आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासल्याने संशयित आरोपींशी संपर्क साधला व 50 हजार रुपये फोनपे अकाऊंटवर देण्यात आले. मात्र, इंजेक्शनवरील टोल फ्री नंबरवर फोन केला असता तो नंबर अवैध असल्याचे सांगण्यात आले. यानंतर या नातेवाईंकाना संशय आल्याने इंजेक्शन परत घ्या, पैसे परत करा, असे म्हणताच एकमेकांवर ढकलाढकली सुरू झाली. माझे नाव सांगू नको, असे बोलून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. इंजेक्शन ज्या व्यक्तीकडून आणले आहेत तो परत घेत नाही, असे नातेवाईंकांना सांगण्यात आले. यानंतर वाद सुरू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी अखेर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिल्यानंतर बार्शी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा पोलीस शोध घेत आहे.
हेही वाचा -... अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; मराठा नेत्यांची मागणी