सोलापूर - सोलापूर जिल्ह्याला कोरोना लसीचे दोन लाख डोस मिळाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील 150 केंद्रांवर दोन लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार शहरात आणि जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकृत माहिती दिली. जिल्ह्यातील 16 लाख 14 हजार नागरिकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
सोलापुरात आजतागायत झालेले लसीकरण -
आतापर्यंत कोविशिल्डच्या लसीचे 14 लाख 22 हजार 840 डोस मिळाले आहेत. कोवॅक्सिनचे 82 हजार 640 इतके डोस मिळाले आहेत. ऑगस्टपर्यंत 11 लाख 74 हजार 310 जणांना कोरोनाचा पहिला, तर 4 लाख 39 हजार 720 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे सोलापुरात एकूण लसीकरण 16 लाख 14 हजार इतके झाले आहे.