सोलापूर -राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहरात संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके नेमून विभाग 1 व विभाग 2 हद्दीमध्ये पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात आली आहे. पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान बहुतांश रिक्षाचालक यांनी रॅपिड टेस्ट केली नसल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 25 रिक्षाचालकांना अडवून त्यांची जागेवरच रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. तसेच दर 15 दिवसांनी रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक केले आहे.
शनिवारी महावीर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, निखिल पवार व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीसाठी नेमण्यात आले होते. नाकाबंदी मध्ये रिक्षाचालकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट केली का, याची तपासणी केली. रॅपिड अँटिजेन टेस्ट न केलेल्या रिक्षाचालकांना थांबवून एकूण 25 रिक्षाचालकांच्या टेस्ट करून घेण्यात आल्या.