सोलापूर-माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे. रणजित निंबाळकर ही फलटण तालुक्यातील कीड आहे. ही कीड आता माढा लोकसभेच्या निमित्ताने सगळीकडे फिरत आहे. त्यामुळे आमच्या तालुक्यातील ही कीड हद्दपार करा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. पोथरे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पोथरे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना रामराजे निंबाळकर. आज लोक भयानक परिस्थितीतून जात आहेत. सरकार निष्क्रिय पध्दतीने काम करीत आहे. आघाडी सरकारच्या काळात जनतेच्या हिताची अनेक कामे आम्ही केली. आजच्या घडीला शेतकऱयांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. आम्ही एका सहीवर चारा छावण्या शेतकऱयांना दिल्या. आज सरकारने यासाठी शंभर अटी घातल्या आहेत. हे निष्क्रिय सरकार आता पुन्हा निवडून येणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय शिंदे यांना बहुमताने निवडून द्यावे, असे रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले.
'ही' कर्जबाजारी मंडळी राजघराण्यातील असू शकत नाहीत
नाईक-निंबाळकर म्हणाले, आज आमच्या आडनावाची माणसे तुमच्या तालुक्यात येऊन तुम्हाला फसवत आहेत. त्यांना फलटण तालुक्यात मल्ल्या म्हणून ओळखले जाते. स्वतःच्या संस्थेवर कर्ज घेऊन लोकांचे संसार यांनी उद्ध्वस्त केले आहेत. हे ज्या स्थिरीकरणावर मतदान मागत आहेत, ती योजना याच बाप-लेकांनी बंद पाडली होती. आमचे त्यांचे कोणतेच नाते नसून ही कर्जबाजारी मंडळी कधीच राजघराण्यातील असू शकत नाहीत. स्वतःचे कर्तृत्व शून्य असून हे लोकांना मतेच कशी मागतात असा प्रश्न त्यांनी विचारला.
संस्था अडचणीत आल्याने डॉ. सुजय विखेंनी सोडला पक्ष
मोहिते-पाटील यांच्यावर बोलताना निंबाळकर म्हणाले की, यांच्या संस्था आज अडचणीत आहेत म्हणून यांनी पक्ष सोडला. शंकरराव मोहिते-पाटील यांचे हे घर आता राहिले नाही. यांनी सत्तेत असताना जिल्हा बँक, कारखाने यावर कर्ज काढले म्हणूनच आज राष्ट्रवादी सोडून हे गेले आहेत.
यावेळी रश्मी बागल यांनी सरकार विरोधी आपला रोष आपल्या भाषणातून काढला. संजय मामा शिंदे यांना प्रमाणिकपणे साथ देत आपण तालुक्यातून लीड देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, यशवंत शिंदे, सुनील सावंत, गौतम ढाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.