पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पाच तालुक्यांमध्ये शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन दिनानिमित्ताने राखी व्यापाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे राखी विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. संचारबंदीमुळे राखी विक्री व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
राखी विक्रीतून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा आर्थिक व्यवहार
श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मामध्ये राखी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यातच हिंदू धर्मातील प्रमुख सण साजरे केले जातात. त्यामध्ये रक्षा बंधन हा बहीण-भावांचा नात्यातील गोडवा निर्माण करणारा सण आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात व्यापाऱ्यांकडून शहरांमध्ये राख्या विक्रीचे स्टॉल उभारले जातात. राख्या खरेदीसाठी व्यापारी एक महिना आधी तयारी करत असतात. पंढरपूर शहरात शंभर ते दीडशे व्यापारी राखी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार चालू होतात. राखी पौर्णिमेनिमित्त बहिणी भावांसाठी राखी खरेदी करत असतात. त्यातून बाजारात आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणावर होती. यातूनच राखी विक्री करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालत असतो.