सोलापूर- जिल्ह्याला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने झोडपले होते. त्यानंतर आठवडा भराची विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. दसऱ्याच्या दिवशी सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे नाले पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. तिऱ्हे गावात पाणी फाउंडेशने केलेल्या कामामुळे या पावसाळ्यात तिऱ्हे गावातील गारभवानी परिसरमात्र जलयुक्त झाला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने खोलीकरण केल्यानंतर पहिल्यांदाच हा ओढा भरून वाहू लागला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गाव परिसरात रविवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सीना नदीच्या महापुराचे ओसरलेल्या पाणी-पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच गावातील गारभवानी परिसरातून ओढ्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार सुमारे १५ वर्षापूर्वी हा ओढा पावसाळ्यानंतरही ३ महिने वाहात होता. त्यानंतर मात्र पर्जन्यमानाचे प्रमाण कमी झाल्याने ओढा वाहने बंद झाले होते.