सोलापूर - कोरोना महामारीमुळे अनेक शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. पण आता शासकीय कार्यालये जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहेत. सोलापूर मुख्य रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रे देखील सुरू झाली आहेत.
सोलापूर मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांत गणले जाते. दक्षिण भारतात जाण्यासाठी सोलापूर रेल्वेस्थानक मुख्य जंक्शन आहे. सोलापूर जिल्ह्यातूनच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत जाण्यासाठी रेल्वेसेवा आहे. तसेच पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी देखील हेच मोठे जंक्शन आहे. प्रवाशांची संख्या देखील मोठी असते. लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर आरक्षण केंद्रे व तिकीट बुकिंग काऊंटर देखील बंद होती. रेल्वे प्रशासनाने गेल्या 1 नोव्हेंबरपासून सोलापूर डिव्हिजनमधील सर्व स्थानकांवरील आरक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. 1 नोव्हेंबरपासून आरक्षण खिडक्या सुरू
सोलापूर डिव्हिजनमधील सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, शिर्डी, गुलबर्गा, वाडी या स्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर मोठी गर्दी असते. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने केवळ मालवाहतूक सुरू होती. कडक लॉकडाऊन नंतर जनजीवन पूर्वपदावर येत असून हळूहळू प्रवाशांसाठी स्पेशल गाड्या सुरू होत आहेत. रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवरील आरक्षण खिडक्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता ऑनलाइन तिकीट आणि आरक्षण खिडकीवरील तिकीट उपलब्ध होत आहे.
हेही वाचा- 'गोस्वामी झिंदाबाद'चे नारे देणाऱ्यांची 'पाठशाळा' घेण्याची गरज, संजय राऊतांची भाजपवर टीका