सोलापूर- विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी राज्यात मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनुक्रमे 62.07 व 85.09 टक्के मतदान झाले आहे.
मतदारांचे तापमान तपासताना दुपारनंतर मतदानाला गर्दी
जिल्ह्यात मंगळवारी कडाक्याचे ऊन पडले होते. त्यामुळे सकाळपासून तुरळक प्रमाण असलेला मतदारांनी दुपारनंतर मतदान केंद्राकडे गर्दी केली होती.
जिल्ह्यात एकूण 197 मतदान केंद्र
सोलापूर जिल्ह्यात पदवीधरांसाठी 123 तर शिक्षक मतदारांसाठी 74, असे 197 मतदान केंद्रे होती.
33 हजार 399 पदवीध मतदारांनी केले मतदान
जिल्ह्यात 5 हजार 813 पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी 62.07 टक्के म्हणजेच 33 हजार 399 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 27 हजार 170 पुरुष तर 6 हजार 229 स्त्रीयांचा समावेश आहे.
11 हजार 558 शिक्षक मतदारांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क
जिल्ह्यात 13 हजार 494 शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी 85.09 टक्के म्हणजेच 11 हजार 558 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 9 हजार 225 पुरुष तर 2 हजार 371 स्त्रीयांचा समावेश आहे.
3 डिसेंबरला लागणार निकाल
विधानपरिषेदसाठी शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. याचे निकाल गुरूवारी (दि. 3 डिसेंबर) निकाल लागणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनाबाबतच्या नियमांची अंमलबजावणी
जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदानासाठी आलेल्या प्रत्येकाच्या शरिराचे तापमान तपासले जात होते. तसेच सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली होती. मास्क असल्याशिवाय कोणालाच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात नव्हता.
हेही वाचा -वेळापूर येथे टिप्पर व मोटरसायकलची धडक, तीन जण ठार
हेही वाचा -त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पणत्यांच्या दीपोत्सवात उजळले विठ्ठल मंदिर