सोलापूर - वाढत्या महागाई विरोधात सोलापूर युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. एकाच महिन्यात सलग चार वेळा घरगुती वापराच्या गॅस दरात वाढ केली आहे. याचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात गॅस टाकीला गळफास देत दरवाढीचा निषेध केला. सर्वसामान्य महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केंद्र सरकार किंवा मोदी सरकारने ही दरवाढ मागे घेऊन भारतीय जनतेला दिलासा द्यावा, अशी देखील मागणी केली. अन्यथा भविष्यात तीव्र जनआंदोलन उभे करू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
एकाच महिन्यात 125 रुपयांची गॅस दरवाढ -
फेब्रुवारी महिन्यात सलग चार वेळा घरगुती वापरातील गॅसची दरवाढ झाली आहे. 4 फेब्रुवारी रोजी 25 रुपयांची वाढ झाली होती. तर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली. तर पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस 25 रुपयांची वाढ करण्यात आली. मार्चच्या पहिल्याच दिवशी आणखीन 25 रुपये वाढ झाली आहे. फेब्रुवारी या एकाच महिन्यात 125 रुपयांनी गॅस दरवाढ झाली आहे.