पंढरपूर (सोलापूर) - गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या व भारतीय राजकारणातले चाणाक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ओळखले जाते. आता पवारांवर पंढरपुरातील एका प्राध्यापकाने पीएचडी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे', असा मिश्किल शैलीत टोला लगावला होता. मात्र, त्यांची ती इच्छा पंढरपूर शहरातील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या दत्तात्रेय काळेल यांनी पूर्ण केली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून शरद पवार यांच्यावरील शोधनिबंधला मान्यताही देण्यात आली आहे.
पंढरपुरातील प्राध्यापकांकडून शरद पवारांवर पीएचडी
डॉ. प्रा. दत्तात्रेय काळेल सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील राहणारे आहेत. पंढरपूर येथील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, त्यावेळेस त्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वगुणाचे आकर्षण होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात एमफिल केली. यावेळी त्यांना 'शरद पवार व महाराष्ट्रात पुरोगामी दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर चिकित्सक पद्धतीने संशोधन करण्याची संधी मिळाली. 1978 साली शरद पवार यांनी महाराष्ट्र 7 पक्षाचे मिळून पुलोदचे सरकार स्थापन केले होते. मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सकपणे अभ्यास करून प्राध्यापक काळेल यानी संशोधन केले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून शरद पवार यांच्या केलेल्या संशोधनावर त्यांना मान्यताही मिळाली आहे.
खासदार शरद पवार यांची संशोधन संदर्भात भेट