सोलापूर -शहरात खासगी सावकारकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर बझार पोलीस ठाण्यांतर्गत एका खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाला. सोलापूर महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने शहरातील एका खासगी सावकाराकडून एक लाख रुपये घेतले होते. बजरंग प्रल्हाद अवताडे( वय 68 वर्षे, रा. निराळे वस्ती) या खासगी सावकाराने एका लाखाच्या बदल्यात दरमहा 12 हजार रुपयांप्रमाणे सतरा लाख रुपये वसूल केल्याचे उघड झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने 2008 साली आरोपी बजरंग अवताडेकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. 2013 साली त्या निवृत्त कर्मचाऱ्याने व्याजासहित मुद्दल देखील परत दिली. मात्र, आरोपी सावकराने दमदाटी करत व्याज आकारणी सुरूच ठेवली. 2014पासून आजतागायत दरमहा 12 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख रुपयांच्या बदल्यात 17 लाख रुपये वसूल केले आहे.
शेवटी या खासगी सावकराच्या जाचाला कंटाळून पीडित निवृत्त कर्मचाऱ्याने शुक्रवारी (दि. 31 जुलै) सायंकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर तत्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ताबडतोब आरोपी सावकाराच्या मुसक्या आवाळल्या. आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.