माढा (सोलापूर)- कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. मात्र, माढा तालुक्यातील पॅरोलवर बाहेर असलेला कैदी गणेश घुगे कोरोनाच्या लसीसाठी स्वतःचे जीवन अर्पण करण्यासाठी पुढे आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या संशोधनासाठी माझे शरीर स्वच्छेने देण्यास तयार असल्याचे निवेदन घुगे याने तहसीलदार राजेश चव्हाण यांची भेट घेऊन दिले आहे. जिल्हाधिकारी यांना देखील त्याने निवेदन पाठवलेय.
गणेश हनुमंत घुगे माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावचा रहिवासी आहे. तो औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सध्या कोरोनाचे संकट असल्याने तो पॅरोलवर बाहेर आला आहे.
कोरोनाचे संकट मानव जातीवर ओढावलेले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी कोरोना योद्धा म्हणून मला स्वतःचे प्राण देशासाठी अर्पण करण्यासाठी संधी मिळावी. कोरोना लसीची चाचणी माझ्यावर करावी यासाठी मी माझ्या मनाने पुढे आलो आहे. प्राण्यांवर लसी संदर्भात प्रयोग सुरू आहेत, माणसांचे कोरोनामुळे जीव जात असताना मला गहिवरुन आल्याने मी चाचणी करण्यासाठी पुढे आलोय. तिरंग्यामध्ये मरण्यासारख दुसरे कोणतच भाग्य नाही, असे गणेश घुगे याने म्हटले आहे.
गणेश घुगे याने माझी भेट घेऊन निवेदन दिलेले आहे.स्वतःचे शरीर कोरोना उपचार संशोधन देण्यासाठी तयार असल्याचे त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले असून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवणार आहे, असे माढा तालुक्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितले.
देशासाठी समाज हितासाठी माझे जीवन उपयोगी यावे असे मला प्रकर्षाने वाटते, असे घुगे याने निवेदनात म्हटले आहे.