सोलापूर - मोहोळ येथील सब जेलमध्ये गुरुदत्त रामचंद्र चौगुले (वय 39 रा, मुंडेवाडी, ता मोहोळ) या संशयित आरोपीने शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संशयित आरोपी गुरुदत्त हा गेल्या महिन्यापासून पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी मध्यरात्री आत्महत्या करताना सब जेलमधील पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण गायकवाड यांनी तत्काळ त्याचा गळफास काढून सोलापूर सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केले.
गुरुदत्त चौगुले हा पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. नैराश्यामधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गुरुदत्त चौगुले याच्या पत्नीने प्रियकर याला 8 लाख रुपये दिले होते. हा व्यवहार झाल्याची नोंद एका डायरीमध्ये होती. ही डायरी सापडल्याने गुरुदत्तने चिडून 15 जून रोजी पत्नीचा खून केला होता. पोलिसांनी त्याला अटक करून त्यावर भा.दं.वि. 302 गुन्हा दाखल केला.
गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुदत्त चौगुले यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले करत आहेत.