सोलापूर :Prime Minister Modi will visit Maharashtra : पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सोलापुरात 365 एकर जागेवर गृह प्रकल्प उभारण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचं वाटप करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नवीन चेहरा कोण असणार :काही दिवसांवर लोकसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी महाराष्ट्रात दौरे वाढवलेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याला भाजपाचे डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी महाराज खासदार आहेत. ते आपल्या जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, हा नवीन चेहरा कोण असणार याबाबत भाजपाने अजूनतरी काही उघड केलेलं नाही.
महिला उमेदवार देणार का : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (2022)मध्येचं राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यासाठी हाय कमांडकडं नाव पाठवण्यात आलं आहे. प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जर प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळालं, तर भाजपाही लोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार दोणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
निमित्त उद्घाटनाचे उद्दिष्ट लोकसभेचे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर प्रमुख आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने 30 हजार कामगारांसाठी गृह प्रकल्प साकार होत आहे. सुरुवातीला 15 हजार कामगारांना घरं मंजूर झाली आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उपस्थितीतच चावी वाटप केले जाणार आहे. परंतु, हा कार्यक्रम असला तरी भाजपा एक प्रकारचा प्रचारचं याच्या माध्यमातून करणार आहे, असंही शहरात काही नागरिक बोलत आहेत.
नरेंद्र मोदींचा सोलापुरात रोड शो होण्याची शक्यता :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या शहरात दौरे करत आहेत. ''अबकी बार चार सौ पार'' असा नारा भाजपाने अगोदरच दिला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंबर कसली आहे. नाशिक दौऱ्यानंतर नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा होत आहे. नाशिक प्रमाणे सोलापूर शहरात नरेंद्र मोदी यांचा रोड शो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोड शोच्या माध्यमाने सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे हे मात्र नक्की.