पंढरपूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. परंतु सध्या त्यांना सत्ताधारी पक्षाकडून विधान परिषद मिळणार आहे. त्यामुळे ते आंदोलन करताना दिसत नाहीत. राजू शेट्टी यांच्यामधील शेतकरी मेला असल्याची टीका विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. पंढरपूर तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, या तीन डगरीवरच्या सरकारला शेतकर्यांचे काही देणे घेणे नाही. त्यामुळेच अजून अतिवृष्टी होणार असल्याचे शेतकर्यांना सांगत आहेत. त्यानंतर होणार्या पिकांचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे करु, असे म्हणत आहेत. असे म्हणणे म्हणजे वेळकाढू पणा असून शेतकर्यांची क्रूर थट्टा लावली आहे. शेतकर्यांना काही मदत करायची भावना असेल तर केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने कर्ज काढावे. अद्यापही 60 ते 70 हजार कोटी कर्जे काढता येते.