पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय समिती तसेच पोलीस प्रशासनाने समन्वायाने काम करावे. यामध्ये नवीन रुग्णांची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपकार्यकारी अभियंता हनुमंत बागल, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनिल वाळुंजकर, डॉ. सरोदे आदी उपस्थित होते.
सचिन ढोले म्हणाले, क्वारंटाईन सेंटरवर उपचारासाठी दाखल असेलेल्या रुग्णांना जेवणाचा तसेच तेथे आवश्यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा बांधकाम विभागाने करावा. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, असेही ढोले यांनी सांगितले.