महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढीनंतर प्रक्षाळपूजेने श्री विठ्ठलाचे नित्योपचार सुरू

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. शेकडो तास अहोरात्र माऊलीने भक्तांना दर्शन दिले. त्यामुळे थकवा आलेल्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. विठूरायाला गरम पाणी व दह्या दूधाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले.

विठूरायाची प्रक्षाळ पूजा

By

Published : Jul 22, 2019, 12:00 AM IST

Updated : Jul 22, 2019, 4:18 AM IST

सोलापूर - आषाढी वारीमध्ये विठूरायाने शेकडो भाविकांना दर्शन दिले. शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठूरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आले.

आषाढी नंतर प्रक्षाळपूजेने श्री विठ्ठलाचे नित्योपचार सुरु

आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठूराया अहोरात्र उभा होता. यात्रा सुरू झाल्यापासून २४ तास दर्शन सुरू असल्याने विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता. या काळात देवाचे सर्व राजोपचार बंद होते. ते रविवारपासून पूर्ववत करण्यात आले आहे. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. रविवारी दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना असते. यावेळी देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे.

त्याचप्रमाणे देवाला सुंदर चॉकलेटी रंगाचा मखमली अंगरखा, सोनेरी पितांबर आणि भगवा शेला असा पोशाख परिधान करण्यात आला. तसेच सुवर्ण अलंकारानेही सजविण्यात आले. मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी चंदनाचा टिळा, दंडाला दंड पेट्या आणि गळयात सुवर्ण चंद्रहार असे पारंपारिक दागिन्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीस सजविण्यात आले होते.

अर्थात, या परंपरा सर्वसामान्य माणसांप्रमाणे पाळल्या जात असल्या तरी हे सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात. तसेच आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी या मागची भावना आहे.

Last Updated : Jul 22, 2019, 4:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details