सोलापूर - प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालत, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मुन्याप्पा बज्जर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, प्रहार संघटनेच्या अजित कुलकर्णी व खालिद मणियार यांना अटक झाली आहे. तर अन्य काही कार्यकर्ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, प्रहार संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालत, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मुन्याप्पा बज्जर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, प्रहार संघटनेच्या अजित कुलकर्णी व खालिद मणियार यांना अटक झाली आहे.
मंगळवारी दुपारी इब्राहिम मुलाणी या व्यक्तीने सावकारी जाचास कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी तत्वावर शिपाई पदावर कार्यरत असलेल्या मुन्याप्पा सिद्राम बज्जर यांनी या व्यक्तीची समजूत घालत, त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मुन्याप्पा सिद्राम बज्जर यांना विरोध करण्यात आला. व त्या व्यक्तील आंदोलन करू द्या असे सांगण्यात आले. यावेळी बज्जर आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी त्यांच्याकडून बज्जर यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मंगळीवारी रात्री उशिरा याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.