सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सोलापुरात प्रहारच्या वतीने भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच भिडे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी भिडे गुरुजी यांचा निषेध केला आहे. भिडे गुरुजी यांच्या धोतरात साप सोडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भिडे यांनी मेडिकल, फिजिकल तपासून घ्यावे असे देखील म्हटले आहे.
काय म्हणाले होते, संभाजी भिडे : पिंपरी येथील दिघी या ठिकाणी संभाजी भिडे यांचे व्यख्यान झाले होते. या व्याख्यानात भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्य दीनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, या दिवशी दुखवटा पाळा, या वादग्रस्त वक्तव्याने भिडे गुरुजीनी पुन्हा एकदा एक नवा वाद ओढावला आहे. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, कारण या दिवशी देशाची फाळणी झाली होती, असे ते म्हणाले होते. आता भिडे गुरुजींच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध होण्यास सुरुवात झाली आहे.