सोलापूर- 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेत पक्ष म्हणून मान्यताच नाही. मग राष्ट्रवादीचे नेते माळशिरसच्या 6 सदस्यांविरुध्द व्हीप कसा काढू शकतात? वा अपात्रतेची कारवाई करु शकत नाहीत,' असा युक्तिवाद मोहिते-पाटील गटाच्या 6 सदस्यांनी उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने त्यांच्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या या सदस्यांनी ऐनवेळी भाजप व समविचारी गटाला मतदान केले. यानंतर राष्ट्रवादीने त्यांना अपात्र ठरवण्यासाठी व्हीप बजावला होता.
गत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या 6 सदस्यांनी ऐनवेळी भाजप व समविचारी गटाला मतदान केल्यामुळे शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे जि. प. चे अध्यक्ष बनले. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी सदर सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी व्हिप बजावला व जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. या मागणी विरोधात या 6 सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांनी याप्रकरणात जो युक्तिवाद केला तो ऐकून उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देत जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.