पंढरपूर -सोलापूर जिल्ह्यात तब्बल 85 हजार 509 हेक्टर डाळिंब क्षेत्र असून, त्यापैकी तब्बल 18 हजार 194 हेक्टर डाळिंब क्षेत्र एकट्या सांगोला तालुक्यात आहे. येथील डाळिंब उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी डाळिंब क्रांती अभियानाची घोषणा केली. त्या दृष्टीने 15 कलमी कार्यक्रम मांडला आहे. यामध्ये तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा डाळिंब प्रक्रिया उद्योग आणि देशातील पहिली डाळिंब बॅक उभा करणार असल्याची घोषणा कदम यांनी केली आहे.
कदम यांनी घोषणा केलेल्या अभियानांतर्गत तीन जिल्ह्यांतील 20 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन 15 कलमी कार्यक्रम राबवला जाईल. सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील डाळिंब क्षेत्राला आतंरराष्ट्रीय दर्जा व स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यपालांची वेळ मिळेना.., मात्र शरद पवार यांच्यासमोर शेतकरी पुत्राने मांडली व्यथा
डाळिंब क्रांती अभियानातील 15 कलमी कार्यक्रमात स्वतंत्र डाळिंब विक्री व्यवस्थापन व माहिती केंद्र उभा करणे, सांगोला येथे डाळिंब संशोधन उपकेंद्र सुरू करणे, नव्याने सोलापूर येथे विकसित होणाऱ्या विमानतळावर डाळिंबासाठी स्वतंत्र कार्गो हब उभारणे, डाळिंब पीकविमा दुरुस्ती धोरण आणणे, सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागाअंतर्गत स्वतंत्र डाळिंब विकास अधिकारी पद निर्माण करणे, नवीन बॅंकिंग धोरण व व्यवस्था निर्माण करणे, खतामध्ये होणारी फसवणूक थांबविण्यासाठी डाळिंब क्षेत्रात स्वतंत्र नियंत्रण व भरारी पथक नेमणे, डाळिंब भवन उभारणे आदी महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा समावेश आहे.
डाळिंब क्रांती अभियानाची 15 उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची 15 कृती गट स्थापन करणार असून, राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून या उद्दिष्टांच्या माध्यमातून डाळिंब क्षेत्राला जागतिक पातळीवर वैभवाचे स्थान व दर्जा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.
हेही वाचा -VIDEO : लसूण सोलण्याची मजेशीर पद्धत; सोशल मीडियावर होतेय प्रचंड व्हायरल