सोलापूर: सोलापूर शहरात घरफोड्या, दुचाकी चोरी, दोन गटांतील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने सोलापूर पोलिसांनी क्यूआरकोडची नवीन संकल्पना आणली आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने जवळपास 400 ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेटी देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पुढाकार घेतला असून, आणखी शंभर ठिकाणी क्यूआर कोड लावले जाणार आहेत. याबाबत डीसीपी विजय कबाडे यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांची करडी नजर शहर सोलापूर शहरात असणार आहे.
क्यू कोड नुसार पोलिसांची पेट्रोलिंग सुरू: सोलापूर शहरात दरमहा सरासरी 35 दुचाकींची चोरी होते. तर 10 ते 12 ठिकाणी घरफोडी होते. परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी झाली आहे. सोलापुरात चेन स्नॅचिंग व मोबाईल हिसकावण्याचेही प्रकार होत आहेत. अनेकदा दोन गटांत हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंट, बंगल्यांमध्ये चोरी होऊ लागली असून पार्किंग असो वा रस्त्यालगत, मंदिराजवळ, दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी चोरी होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने पोलीस उपायुक्त कबाडे यांनी क्यूआर कोड पेट्रोलिंग सुरू केली आहे.
सोलापूर पोलिसांनी क्यूआरकोडची नवीन संकल्पना आणली आहे. शहरात जवळपास 400 ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज त्याठिकाणी जाऊन स्वतःच्या मोबाईलमध्ये तो क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. -डीसीपी विजय कबाडे