सोलापूर- शहर व जिल्ह्यात जानेवारी, 2021 ते जुलै 2021 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 16 कारवाया केल्या आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे. यात पाच करावाया पोलीस खात्याबाबत झाल्या असून सहा पोलिसांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाच घेताना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीत पोलीस खाते अव्वल असल्याचे दिसून येत आहे.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्याना साडेसात लाख रुपयांची लाच घेताना कारवाई शुक्रवारी (दि. 9 जुलै) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रमाणिकपणे काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या असताना देखील काही भ्रष्ट पोलीस अधिकरी व कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र दिसत आहे.
लाच घेणाऱ्या पोलिसांवर कारवाया झाल्या 5; मात्र अटक झाले 6 पोलीस
गडचिरोलीहून बलदी होऊन आलेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यामुळे सोलापूर शहर पोलीस खाते शिस्तबद्धपणे काम करत आहे. कामात कुचराई करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी अनेक उपाययोजना केल्या. दुसरीकडे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. इतके कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असूनही सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक यांच्या यादीत पोलीस खात्याचे नाव अव्वल आले आहे. जानेवारी 2021 पासून जुलै 2021 पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात एकूण 16 कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये 5 कारवाया एकट्या पोलीस खात्याच्या आहेत. यात सहा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.