सोलापूर:होटगी रोड येथे विमानतळ सुरू करण्याच्या मागणीवरून चक्री उपोषणाला बसलेले उद्योजक केतन शहा यांना 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी सार्वजनिक ठिकाणी रिवॉल्व्हर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. अद्यापही याबाबतचा गुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी पोलिस आयुक्तालयाने काडादींना नोटीस बजावली आहे. रिवॉल्व्हर स्वरक्षणार्थ असतानाही त्याचा गैरवापर केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. केतन शहा यांना याबाबत गुन्हा का दाखल केला नाही. पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद का दिली नाही, अशी माहिती विचारली असता, ते म्हणतात की पोलिसांनी स्वतःहुन गुन्हा दाखल करून कारवाई करावी.
रिव्हॉल्व्हर परवाना रद्द का करू नये अशी नोटीस:राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची गरज व मागणी पडताळून पोलिस व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रिवॉल्व्हरचा परवाना दिला जातो. त्याचा स्वत:च्या रक्षणासाठीच वापर करता येतो. गैरवापर केल्यास परवाना रद्द केला जातो. रिवॉल्व्हर देताना पोलिसांकडून अटी व शर्थी घालून दिल्या जातात. त्याचा भंग केल्यास संबंधिताला नोटीस बजावली जाते. त्यानंतर आठ-दहा दिवसांत पोलिस आयुक्तांना खुलासा देणे बंधनकारक आहे.
नोटीस बजावली: पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी धर्मराज काडादी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक ठिकाणी खिशातून रिवॉल्व्हर काढून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यासंबंधी खुलासा करावा. तुमच्याकडील रिवॉल्व्हरचा परवाना रद्द का करू नये, यासंबंधी नोटिशीतून विचारणा करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.