सोलापूर- मोबाईल चोरी करुन पसार झालेल्या अल्पवयीन चोराच्या मुसक्या आवळण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आले आहे. या अल्पवयीन चोराकडून तब्बल दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. नामांकीत कंपनीच्या मोबाईलसह एक लॅपटॉपही पोलिसांनी या चोरट्याकडून जप्त केला आहे.
पोलिसांनी आवळल्या अल्पवयीन चोराच्या मुसक्या; जप्त केला दीड लाखांचा ऐवज
अल्पवयीन मोबाईल चोराच्या मुसक्या आवळण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आले आहे. या अल्पवयीन चोराकडून तब्बल दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
अल्पवयीन आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पकडण्यात आले आहे. एक अल्पवयीन मुलगा विजापूर रोडवरील आरटीओ कार्यालजवळ मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
या अल्पवयीन चोरट्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने चोरीचे मोबाईल विकत असल्याची कबुली दिली. तसेच विक्रीसाठी आणलेला मोबाईल देखील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील होता. त्याला पोलीस ठाण्यात नेत त्याच्याकडून सर्व गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी 11 मोबाईल 1 लॅपटॉप असा एकूण 1 लाख 44 हजार 399 रुपयांचा मुद्देमाल त्याने पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलीस नाईक प्रकाश पवार, रोहन ढावरे, विशाल बोराडे, आलम बिराजदार आदींनी पार पाडल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.