सोलापूर - विवाहाची जय्यत तयारी झाली होती. विवाहाच्या रेशमी बंधनात अडकण्यास वधू-वर तयार होते. आशीर्वाद देण्यासाठी पाहुणेमंडळीदेखील हजर होती. नियमाप्रमाणे लग्नानंतर वधू वरासोबत सासरी जाते. मात्र बार्शित वधू-वर, नातेवाईक यांना थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
बार्शी तहसील कार्यालयात या बाल विवाहाबाबत माहिती देण्यात आली होती. तहसील कार्यालयाने ही माहिती त्वरित बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळवली. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्वरित दखल घेतली व पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर, हवालदार लक्ष्मण भांगे, श्रीमंत खराडे, रविकुमार लगदिवे, मलंग मुलाणी, महिला पोलिस स्वाती डोईफोडे यांचे पथक विवाहस्थळी रवाना केले.
वधू-वराच्या वयाची तपासणी पोलिसांनी केली असता, वधूचे व वराचे दोघांचेही वय 19 असल्याचे निष्पन्न झाले. विवाह कायद्यानुसार वराचे वय 21 असणे आवश्यक आहे तर वधूचे 18 वर्षे. वधूचे वय कायद्यानुसार पूर्ण होते पण वराचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी होते. म्हणून पोलिसांनी अखेर विवाह थांबवला. पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी संसार थाटण्यास निघालेल्या दोन्ही वर-वधूचे समुपदेशन केले. नातेवाईक, मित्रमंडळींना समज देण्यात आली आहे.