सोलापूर PM Modi in Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील 15 हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.
Live Updates-
- पंतप्रधान मोदी म्हणाले," माझं आणि सोलापूरचं जुन नातं आहे. गरिबाचं कल्याण हे आमचे ध्येय आहे. नव्या घरात राहणाऱ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत".
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सोलापूरच्या पवित्र भूमीत पंतप्रधान मोदींचं स्वागत करतो. मोदीजींच्या हाताला यश आहे. असं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. दावोसमध्ये अनेक लोक भेटले. सगळे लोक मोदीजींचे नाव घेत होते."
कार्यक्रमानंतर त्यांची मोठी सभाही होणार आहे. तसंच या दौऱ्यात ते रोड शो करणार असल्याचही बोललं जातंय. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याचं सांगितलं जातंय.
देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीची वैशिष्ये काय? दक्षिण सोलापूरातील कुंभारी येथील रे नगरमधील ही वसाहत देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. 350 एकर परिसातील या वसाहतीत 834 इमारती, 30 हजार फ्लॅट्सचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी या प्रकल्पाचं शिलान्यास केलं होतं. जवळपास पाच वर्षांनी पुन्हा नरेंद्र मोदी या वसाहतीमधील घरे लाभार्थ्यांना देण्यासाठी सोलापुरात येत आहेत. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांनादेखील स्वतःच हक्काच घर असावं, या उद्दिष्टानं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरं साकारली आहेत.
पंतप्रधान मोदींचा तीन राज्यांचा मॅरेथॉन दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता सोलापूर इथं अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यानंतर दुपारी 2:45 च्या सुमारास पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरु इथं बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन करतील. तसंच सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभही करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान तामिळनाडूतील चेन्नई इथं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोंदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त : पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्याच्या पोलीस महासंचालकांसह 3 हजार पोलीस आज सोलापुरात तैनात राहणार आहेत. यात दोन विशेष पोलीस महानिरीक्षक, 10 पोलीस पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त, 290 पोलीस निरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक 2 हजार महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी, 108 एसपीजी कमांडो यांचा समावेश आहे. तसंच सभेला येताना मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर्स, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थ, विडी सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थ इत्यादी आणण्यास निर्बंध आणण्यात आले आहेत.
सोलापुरात राजकीय भूंकप होणार :कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भाजपाकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट एका कार्यक्रमात केला होता. त्यातच भाजपा नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्यानं शिंदे भाजपात प्रवेश करणार का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चा दोन्ही बाजूंनी फेटाळण्यात आल्या आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळं मोदींच्या दौऱ्यावेळी इतर पक्षातील नेते भाजपामध्ये प्रवेश करणार का? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा :
- बावनकुळे स्पष्टच बोलले, सुशीलकुमार शिंदेंना भाजपाने कसलीही ऑफर दिली नाही
- चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदेंच्या भेटी मागे राजकीय गणित काय; वाचा विश्लेषकांचं मत