सोलापूर- अंत्यविधी करण्यासाठी दफनभूमी उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवण्याचा बेत असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेतच अडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दफनभूमीच्या मागणीसाठी बार्शी तालुक्यातील आंदोलक मृतदेहासह सोलापूरला येत होते. मात्र ग्रामीण पोलिसांनी त्यांना शहरापासून १० किलोमीटर त्यांची शववाहिका रोखून धरली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही त्याच ठिकाणी आंदोलन सुरू केले आणि दफनभूमीची मागणी लावून धरली.
बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या दफनविधीसाठी पुनर्वसन गावाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नव्हती. या मागणीकरिता या गावातील चाँद गुलाब शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थ शासन दरबारी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पुनर्वसन शाखेने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची ही मागणी शासन दरबारी धूळखात पडली होती. परिणामी गावातील मुस्लिमांना दफनविधीसाठी १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी येथील दफनभूमी शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गावाच्या ठिकाणी शासनाने २० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती.
दफनभूमीच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणारे चाँद शेख यांचे झाले निधन
दरम्यान मौलाना आझाद विचार मंचच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी देखील या दफनभूमीच्या मागणीसाठी आंदोलने सुरू केली होती.त्यात चाँद शेख यांचाही सहभाग होता. बार्शी येथील उडान फाउंडेशन सुद्धा शासन दरबारी पत्रव्यवहार करीत होते. अशात चाँद शेख यांचे अल्पशः आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी जागा मिळावी, यासाठी सदरील संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला.