पंढरपूर- पांडुरंगाची आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी सोहळा प्रतिबंधात्मक स्वरूपाचा होणार आहे. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारी न झाल्यामुळे पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर खड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह भाविकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विठ्ठल मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गासह मुख्य रस्ते खड्ड्यांच्या विळख्यात
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे वैष्णवांचे अखंड दैवत असणाऱ्या पांडुरंगाची आषाढी यात्रा होऊ शकत नाही. त्यामुळे पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या आधी पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर, स्टेशन रोड या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम नगर परिषद प्रशासनाकडून केली जाते. मात्र गेल्या दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारची पांडुरंगाची वारी होऊ शकली नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.