पंढरपूर : ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात अशी टीका रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
'पवार कुटुंबावर टीका करूनच लोक मोठे होतात' पडळकरांवर नाव न घेता टीका
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी ते पंढरपुरात आले होते. पंढरपुरात त्यांनी तीन सभा घेत प्रचार केला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबीयांवर टीका करूनच लोक मोठे होतात. विकासाविषयी ते बोलत नाही असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
राज्याला जास्त लसींची गरज
राज्यातील लसीकरणाबाबत विचारले असता, केंद्र सरकारने एक कोटी लस राज्याला दिल्या असतील तर त्यातील दहा टक्के खराब होऊ शकतात. मात्र राज्यामध्ये केवळ तीन टक्के लस खराब झाल्या. राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. याशिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला जास्त लस द्याव्या असेही ते यावेळी म्हणाले.
विठ्ठल साखर कारखान्यावरून विरोधकांचे राजकारण
विठ्ठल साखर कारखान्यावरून राजकारण केले जात आहे. करमाळा येथील आदिनाथ साखर कारखाना हा शेतकर्यांच्या हितासाठी चालविण्यासाठी घेतला आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी कारखाना हा सहकार तत्त्वावर व सध्याच्या संचालक मंडळानुसारच चालणार आहे. विठ्ठल सहकारी कारखाना कोणत्याही प्रकारे चालविण्यासाठी घेण्याचा विचार नाही. मात्र कारखान्यासाठी कोणतीही मदत देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले.