सोलापूर - जुळे सोलापूर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत, अशी तक्रार उपचार घेत असलेल्या रुग्णांनी केली आहे. लहान मुलांचे आणि वृद्धांची ससेहोलपट होत असल्याची व्यथा रूग्णांनी मांडली आहे. माजी नगरसेविका रेखा बंडे यांनी देखील तक्रार केली असून रूग्णांना योग्य सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचे हाल असल्याची तक्रार आली आहे क्वारंटाईन सेंटर पुन्हा एकदा सुरू -
महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्यावतीने सोलापूर शहरातील म्हाडा कॉलनी येथे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे सुविधांचा अभाव असल्याने रूग्णांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला. सोलापूर शहर आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते यांना क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांनी संपर्क करून तक्रार केली. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत रूग्णांनी व्यक्त केली.
लहान मुलांना अंघोळीची सोय नाही तर जेवणाचाही दर्जा खालावलेला -
शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने शहरातील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना क्वारंटाईन केले आहे. येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांसोबत अनेक लहान मुले आहेत. मात्र, त्यांच्या अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच जेवणाचा देखील दर्जा योग्य नसल्याची माहिती रुग्णांनी दिली.