सोलापूर - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाचा आग्रह स्थानिकांकडून होत आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे.
पार्थ की भगीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी 2019 साली झालेल्या मावळ मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या जमेची बाजू म्हणजे, पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद होय. 2019 च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय असताना दिसले नाही. त्यामुळे, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांकडून देखील पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत अफवा असल्याची बोलले जात आहे.
हेही वाचा -अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच केला खून
भगीरथ भालके हे भारत नाना भालके यांचे सुपुत्र म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये परिचित आहे. भगीरथ भालके यांचा राजकीय जनसंपर्क थोड्या प्रमाणात आहे. मात्र, भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे भालके कुटुंबाविषयी मतदारसंघामध्ये सहानुभूतीची लाट आहे. याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी दाखवली आहे.