महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत सावता माळी यांच्या भेटीसाठी श्री पांडुरंगाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान

आषाढी एकादशीसाठी अनेक संताच्या पालख्या विठूरायाच्या भेटीला पंढरीकडे येतात. पण संत सावता माळी यांच्या भेटीसाठी श्री पांडुरंगाची पालखी अरणला जाते. ही परंपरा शेकडो वर्षापासून पंढरपूरमधून सुरू आहे.

श्री पांडुरंगाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान

By

Published : Jul 28, 2019, 7:19 PM IST

सोलापूर - आषाढी एकादशीसाठी अनेक संताच्या पालख्या विठूरायाच्या भेटीला पंढरीकडे येतात. पण संत सावता माळी यांच्या भेटीसाठी श्री पांडुरंगाची पालखी अरणला जाते. ही परंपरा शेकडो वर्षापासून पंढरपूरमधून सुरू आहे.

श्री पांडुरंगाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान

संत सावता माळी यांनी आपल्या शेतीतच देव पाहिला. ते कधीच पंढरीला गेले नाहीत. परंतु, सावता माळी यांची निस्सीम भक्ती पाहून स्वतः पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी अरणला गेल्याची आख्यायिका आहे.

तर आज (रविवार) सकाळी काशीकापडी समाजाच्या मठातून श्री पांडुरंगाच्या पादूका फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. शेकडो भाविकांच्या सोबत हा पालखी सोहळा संत नामदेव पायरीजवळ आला.

यानंतर मानकऱ्यांनी पादूका डोक्यावर घेऊन श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. या पादूका श्री विठूरायाच्या चरणाजवळ ठेवून विधीवत पूजा झाली. या पादूकामध्ये साक्षात विठ्ठलाचा वास असतो अशी या भाविकांची भावना आहे. यानंतर पुन्हा या पादूका पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर हा सोहळा अरणकडे मार्गस्थ झाला.

तीन दिवसानंतर संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून काला झाल्यानंतर पुन्हा पादुका पंढरपूरमध्ये येतात. देव भक्ताच्या भेटीसाठी पंढरीतून जातात. यामुळे या सोहळ्यास खूप महत्त्व आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details