पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. याबाबत मंदिर समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती कळविण्यात आली आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविला असून या कालावधीत धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. त्यामुळे पंढरपूरचे मंदिरदेखील बंद राहणार आहे. कोरोनामुळे श्री विठ्ठल मंदिर हे 17 मार्चपासून बंद आहे. सोमवारी वंचित बहुजन आणि वारकरी सेनेच्या वतीने विठ्ठल मंदिर भविकांना दर्शनासाठी खुले करावे म्हणून आंदोलन केले होते. राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी नियमावली तयार करून विठ्ठल मंदिर आठ दिवसात खुले करण्याचे आश्वासन यावेळी दिले होते. त्यामुळे वंचित आणि वारकरी सेनेने राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.