पंढरपूर -श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुख दर्शनासाठी स्थानिक नागरिकांना ऑनलाइन बुकींग पासची अट रद्द करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणे सकाळी सहा ते सात या वेळात पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना ऑनलाइन बुकिंग न करता प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ऑनलाइन दर्शनाचे बुकींग करून आलेल्या भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. सुरुवातीस एक हजार भाविकांना दिवसभरात मुखदर्शनासाठी सोडले जात होते. पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना दिपावलीच्या काळात एक दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून दिले होते. तसेच ऑनलाइन बुकींग पास घेण्याची अट ही एक दिवसासाठी रद्द करण्यात आली होती.
हेही वाचा -सोन्याची झळाळी पडतेय फिकी; जागतिक बाजारातील चढ-उताराचा परिणाम