पंढरपूर -जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या आहेत. कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समिती तसेच शहरी भागातील वार्डस्तरीय समितीने विशेष मोहिम राबवून रुग्णांचा शोध घ्यावा, तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून तात्काळ तपासणी करुन उपचार सुरू करावेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किमान 20 पेक्षा जास्त व्हायला हवे. तसेच खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती घ्यावी, त्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करावी. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. तसेच खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत रुग्णासाठी बेड उपलब्ध ठेवावेत. विनामास्क फिरणा-या नागरिकांवर प्रभावीपणे कारवाई करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करावे. जे नागरिक नियमांचे उल्लघंन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी यावेळी सांगितले.