पंढरपूर (सोलापूर)- पंढरपूर येथील संत नामदेव महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.
पालखी मार्गाचे ऑनलाईन भूमीपूजन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हा 221 किलोमीटर मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी या 130 किलोमीटर लांबीच्या पालखी महामार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याची माहिती स्थानिक आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते बारा हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे.
गडकरी घेणार विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दुपारी बारा वाजताच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.